‘समाजभूषण’ अनिल थोरात यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी बहाल; अभिनेता बिंदू दारा सिंग यांच्या हस्ते विशेष गौरव

नवी दिल्ली: ‘वर्ल्ड कल्चरल अँड एज्युकेशनल ऑर्गनायझेशन’च्या संयुक्त विद्यमाने रविवार, २३ ऑगस्ट रोजी दिल्लीतील वजीरपूर (शालीमार बाग) येथील ‘रॉयल पेपर बँक्वेट्स’मध्ये एका भव्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या विशेष व्यासपीठावर ‘आंबेडकरवादी एकता मिशन’चे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक ‘समाजभूषण’ अनिल थोरात यांना त्यांच्या उत्कृष्ट व निस्वार्थ समाजसेवेबद्दल ‘मानद डॉक्टरेट’ (Honorary Doctorate) पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे तथा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता बिंदू दारा सिंग यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. अनिल थोरात हे गेल्या तीन दशकांपासून समाजाचा सर्वांगीण विकास, उत्थान आणि जनकल्याणासाठी अविरतपणे कार्यरत आहेत. विशेषतः गेल्या ५ वर्षांपासून ते आंबेडकरवादी आणि बौद्ध समाजात अखंड सामाजिक एकता, समता आणि बंधुत्वाची भावना रुजवण्यासाठी अहोरात्र जनजागरण मोहीम राबवत आहेत. त्यांच्या याच दूरदृष्टी नेतृत्व, अथक परिश्रम आणि समाजाप्रती असलेल्या समर्पणाची दखल घेऊन त्यांना या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून सन्मानित करण्यात आले आहे.

या दैदिप्यमान यशाबद्दल ‘आंबेडकरवादी एकता मिशन’चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आंबेडकरवादी-बौद्ध समाजातील मान्यवरांनी डॉ. अनिल थोरात यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व दीर्घ आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.